सभासद बंधुभगिनींनो…
आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
कोरोना संकटामुळे आपल्याशी वैयक्तिक संपर्क साधता आला नसला तरी कोरोनाच्या सावटामुळे व आपणा सर्वांच्या काळजीमुळे आपले नाते अधिकच घट्ट झाले आहे असे मनोमन वाटते. गेल्यावर्षीही वार्षिक सभेच्या निमित्ताने व्हीडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे आपण भेटलो, सोशल मिडीयाद्वारेही वर्षभर संपर्कात आहोत, मुख्य कार्यालयातही आपल्याशी चर्चेसाठी आम्ही नेहमी कार्यरत असतो. सध्या खुप कठीण काळ आपण अनुभवतोय म्हणून सर्वांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या !
शासनाचे सर्व नियम पाळा आणि सुरक्षित रहा ! नैसर्गिक संकटापुढे माणूस हतबल आहे, पण त्यातूनच नविन जिद्द व उमेद निर्माण होते. प्रतिकुल परिस्थितीशी झगडताना आपण अधिक कणखर बनत जातो, सक्षम बनत जातो.
संकटे ही येतच रहाणार, मग ती कोरोना रुपी असो किंवा दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे आर्थिक मंदीस्वरुपात आलेली असो, या जगात जगण्यासाठी आपल्याला धडपड करावीच लागणार आहे. अशा संकटांवर मात करण्यासाठी आपण सर्व कायम एकत्र असलो पाहीजे… आणि सहकाराचा हेतू मुळात आपण एकत्र येऊन आपले जीवनमान सुधारणे हाच आहे ! आजच्या परिस्थितीने सहकाराची किती गरज आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. आपल्या हक्काच्या संस्थेमध्ये आपण वेळोवेळी केलेली बचत वा संस्थेकडून घेतलेले अर्थसहाय्य आपल्याला या काळात नक्कीच उपयोगी पडले असेल. कोरोना काळात आपण सर्वसामान्य सभासदांच्या अतिशय छोट्या उद्योगांना संजीवनी देण्यासाठी जवळजवळ ३ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. तसेच त्वरीत कर्ज देता यावे यासाठी संस्थेच्या १६ शाखांमधुन वैयक्तिक कर्ज, सोनेतारण कर्ज, व्यवसाय मित्र अशा योजनेतून अतिशय जलद अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले. छोट्या छोट्या रक्कमेच्या अनेक कर्ज योजनांद्वारे आपण मदतीचा हात दिला आहे. अगदी विद्यार्थी, गृहिणी यांचा देखिल आपण विचार केलेला आहे. अहवाल सालामध्ये आपण रु.११४.२६ कोटी रक्कमेचे कर्जवाटप केले आहे. यापूर्वी केलेले कर्जवाटपही दर्जेदार असल्याने अतिशय चांगली कर्जवसुली झाली आहे. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या प्रामाणिक कर्जदारांसाठी शासनाने रिशेड्युल योजना दिली होती, त्याचाही कर्जदारांना लाभ झाला. थकीत कर्जाचे निव्वळ एनपीए प्रमाण “०” टक्के राखण्यात आपल्याला यश आले आहे. शासनाच्या बाकी सर्व निकषांमध्ये सुद्धा आपण उत्तीर्ण झालो आहोत. मुख्य कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्याचे रुपांतर प्रशिक्षण हॉलमध्ये केले आहे. प्रत्येक कर्मचारी कायम प्रशिक्षित व्हावा, आम्हा संचालकांना सुद्धा नवनविन विषयांचे प्रशिक्षण मिळावे हा हेतु त्यामागे आहे. संस्था चालविण्यासाठी प्रत्येकाने प्रशिक्षीत असणे अतिशय महत्वाचे आहे.
संस्थेच्या स्वमालकीच्या असलेल्या जवळजवळ १५ कोटीच्या मालमत्ता, तसेच आपण दरवर्षीच्या नफ्यातून रु.१२.६४ कोटी रक्कमेचे उभारलेले निधी, अतिशय सुरक्षित बँकांमध्ये रु.९४.६० कोटी रक्कमेची आपण केलेली गुंतवणूक, स्थानिक नामांकीत संचालक सहकारी वर्ग, प्रशिक्षित स्टाफ आणि आपल्यासारखा सुजाण ग्राहकवर्ग ही संस्थेची बलस्थानं आहेत ! यामुळे कोणतेही नैसर्गिक संकट आले तरी संस्था त्याला समर्थपणे तोंड देऊ शकते, याबाबतीत सर्वांनी निश्चिंत असावे !
अशाही परिस्थितीत आपण या वर्षात आपल्या १६ व्या उरण शाखेचे कामकाज सुरु केले असून त्या भागातील ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. शाखांचे जाळे गावोगांव विणल्यामुळे समाजातील सर्व घटकांना त्यांच्या जवळ चांगल्या दर्जाची बँकींग सेवा पुरविण्यात आपण यशस्वी झालो आहोत. सीबीएस प्रणाली, मोबाईल ॲप, आरटीजीस सुविधा अशा अद्ययावत बकींग सुविधा ग्राहक अनुभवत आहेत. लवकरच व्यापाऱ्यांसाठी क्युआर कोड ही व्यवसायवाढीसाठीची एक आधुनिक सुविधा देणार आहोत.
आता व्यवसाय गतीने वाढत आहे, ३१ मार्च २०२२ रोजी आपण ४२२.९२ कोटी इतक्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा गाठलेला आहे. संस्था आता मोठी झाल्यामुळे संस्थेपुढे काही कृत्रिम संकटांचे आव्हान सुद्धा उभे राहील असे आम्ही गृहीत धरतो. या आव्हानांना सक्षमपणे तोंड देण्यास आपण समर्थ आहोत. टिकात्मक बाबीही सकारात्मक विचाराने स्विकारुन त्यातूनही आपण काही चांगले घडवत आहोत. आपली सर्वांची कायम साथ असल्याने अशा प्रसंगीही नेहमीच बळ मिळते. आम्ही आपणा सर्वांसाठी विश्वस्तांच्या भूमिकेत आहोत. या विश्वासाला तडा जाणार नाही.
संस्थेला मिळणाऱ्या नफ्यातून सामाजिक ऋण फेडणेही अगत्याचे आहे. अनेक समाजोपयोगी कामे आपण सतत करत आहोत, मग ते कोरोना काळातील गरजूंना केलेल्या मदती असो, आर्थिक दुर्बल सभासदांच्या नातेवाईकांसाठी केलेली मोतीबींदू ऑपरेशन्ससाठीची मदत असो, कोरोना काळात आवश्यक असणारी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन असो, गरीब विद्यार्थ्यांचे पालकत्व असो….. अशा अनेक कार्यातून सामाजिक जाणीवेचे भान आपण नेहमी जपत आलो आहोत. यापुढेही सामाजिक कामात संस्था पुढे राहील. आपणा सर्वांकडून यापुढेही अशाच भक्कम सहकार्याची अपेक्षा करतो !
जय हिंद! जय महाराष्ट्र ! जय सहकार !